Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
श्रमिक मुक्तीदलाचा सरकारला "दे धक्का'
aikya group
Saturday, March 20, 2010 AT 01:59 AM (IST)
Tags: local

धरणांची कामे बंद
सातारा, दि. 19 : धरणग्रस्तांच्या जगण्याची व अस्तित्वाची लढाई म्हणून श्रमिक मुक्तीदलातर्फे "लढो या मरो' अशी साद देत जिल्ह्यातील तारळी, उरमोडी, मराठवाडी, वांग, उत्तरमांड, निवकणे, सुकवडे इत्यादी धरणांची कामे शुक्रवारी बंद पाडली. कण्हेर धरणावर मोर्चा काढण्यात आला. डॉ. प्रशांत पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात बाधित क्षेत्रातील धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संदर्भात जिल्हाधिकारी विकास देशमुख यांना दलाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
मुरूड : तारळी धरणावर झालेल्या सभेत डॉ. पन्हाळकर म्हणाले, गत महिन्यात धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी सुमारे 17 दिवस ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी धरणग्रस्तांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. पण आजअखेर सुमारे 1 महिना उलटून गेला तरी मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेविषयी काहीच माहिती समजू शकली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना धरणग्रस्तांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाविषयी काही देणे-घेणे राहिले नाही.
10 फेब्रुवारीला झालेले आंदोलन मागे घेताना जिल्ह्यातील सर्व धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी 15 मार्चपूर्वी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक न झाल्यास 15 मार्चनंतर करेंगे या मरेंगे असे आंदोलन करून जोपर्यंत मागण्या मान्य  करण्याबाबत तोडगा निघत नाही. तोपयर्र्ंत धरणाचे काम सुरू करून देण्यात येणार नाही. एकतर शासनाने प्रकल्पग्रस्तांना जमिनी देताना पडीक, नापीक दिल्या आहेत. त्यामुळे त्यातून अत्यल्प उत्पन्न मिळत आहे. राज्याच्या विकासासाठी धरण प्रकल्पग्रस्तांनी आपल्या सोन्यासारख्या जमिनी पाण्याखाली घालवल्या आहेत. पण शासनाने मात्र त्यांच्याच तोंडाला पाने पुसण्याचा उद्योग सुरू केला आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांना सरसकटपणे दारिद्र्यरेषेखालील कार्ड वितरित करावे. ज्यावेळी त्यांच्या शेतीला पाणी द्याल. त्यावेळी पाहिजे तर कार्ड रद्द करावीत. धरणग्रस्त स्त्रियांनी स्थापन केलेल्या बचत गटांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी 100 टक्के अनुदान द्यावे. धरणग्रस्तांच्या पर्यायी वसाहतींना नवीन ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा. यासाठी 1 हजार लोकसंख्येची अट रद्द करून पूर्वीप्रमाणे 350 लोकसंख्येची अट ठेवावी.
धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य करण्याबाबत शासन दुजाभाव करत आहे. मुख्यमंत्र्यांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन किळसवाणा असून लाल फितीच्या कारभारात धरणग्रस्तांना गुंडाळण्याची तयारी केली आहे. याबद्दल सर्वांनी मुख्यमंत्र्यांचा निषेध करत त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
बाजीराव पन्हाळकर म्हणाले, धरणाचे काम 98 टक्के पूर्ण झाले तरी अजून सुमारे 40 टक्के पुनर्वसनाची कामे बाकी आहेत. मुख्यमंत्र्यांना धरणग्रस्तांना वेळ मिळत नाही हे मोठे दुर्दैव आहे. विकासाचा समतोल साधताना धरणग्रस्तांना ठेंगा दाखवला जात आहे. धरण पूर्ण होत आले तरी धरणग्रस्तांना दिलेल्या जमिनीच्या सिंचनाबाबत ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. धरणग्रस्तांच्या विकासाच्या कामासाठी विरोध नसून शासनाने पुनर्वसनाला प्राधान्य दिले पाहिजे. पुनर्वसनाबाबत पुनर्वसन खाते शासनाकडे बोट दाखवत आहे. तर शासन केंद्र शासनाकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहे. आमच्या मागण्या कायदेशीर असून धरणग्रस्तांना जगण्याच्या हक्कासाठी मागत आहोत.
मराठवाडी धरणावर आंदोलन
ढेबेवाडी : वांग-मराठवाडी धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात महसूल मंत्री नारायण राणे, कृष्णा खोरे महामंडळाचे मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने वांग-मराठवाडी धरणग्रस्त संग्राम संघटनेने धरणाचे कामकाज बंद पाडून करेंगे या मरेंगे आंदोलन सुरू केले असून जोपर्यंत मुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याची बैठक होत नाही. तोपर्यंत धरणाचे कामकाज सुरू करू देणार नाही, असा इशारा दिला आहे. यावेळी संग्राम संघटनेचे दिलीप पाटील, जगन्नाथ विभुते, अशोक पाटील, भरत पवार, शंकर देसाई, लालासाहेब पाटील, सुरेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कण्हेर धरणावर मोर्चा
कण्हेर : कण्हेर, ता. सातारा येथील कण्हेर धरणावर परिसरातील अनेक गावातील धरणग्रस्तांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात मोर्चा काढला. कण्हेर धरणाच्या पायथ्यापासून ते रेस्ट हाऊसपर्यंत घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला. धरणग्रस्तांच्या आंदोलनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते याची माहिती तालुका पोलिसांना कळताच धरणाच्या दोन्ही गेटवर सकाळी 9 वाजल्यापासून पोलीस यंत्रणा मोर्चास अटकाव करण्यासाठी सज्ज होती. जमावबंदी आदेश असतानाही तालुका पोलीस निरीक्षकांना निवेदन देवून मोर्चास प्रारंभ झाला. मागण्यांच्या घोषणा देत मोर्चातील धरणग्रस्त व धरण खात्यातील अधिकाऱ्यांची तालुका पोलीस निरीक्षकांच्या सहाय्याने सामुहिक चर्चा झाली.
कण्हेर धरणावरील रेस्ट हाऊसवर धरण खात्यातील अधिकाऱ्यांशी यावर चर्चा करण्यात आली.धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य कराव्यात, धरण भरल्यानंतर तरी तेथे संरक्षण यंत्राणा राबवावी, धरण परिसरात तरुणांचे सुरू असलेल्या अश्लिल चाळ्यांवर उपाययोजना करावी, पाण्यात गेलेल्या जमिनींचे संपादन व्हावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत  पोहचवू, असे शाखा अभियंता डी. जे. जाधव व उपअभियंता बी. बी. तावरे यांनी सांगितले.
बैठकीस सहाय्यक अभियंता अवधूत सावंत, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश माने, उपनिरीक्षक तुकाराम जगदाळे, हवालदार एस. व्ही. फडतरे, उमाकांत नायकवडी, संजय शिर्के, अशोक महाडिक, संजय शिंदे, मोर्चातीलधरणग्रस्त दिलीप पाटील, शांताराम देशमुख, तुकाराम शेलार, रामचंद्र साळुंखे, सौ. सोनाबाई पवार, भगवान ओंबळे, प्रभाकर शेडगे, चंद्रकांत इंगुळकर, श्रमिक मुक्ती दलातील कार्यकर्ते, कण्हेर परिसरारातील वेळे, कामथी, सायळी, निझरे, मोरावळे आदी गावातील धरणग्रस्त उपस्थित होते. (पान 2 पहा)
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: