Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

लोकनेते बाळासाहेब देसाई
ऐक्य समूह
Wednesday, March 10, 2010 AT 12:54 AM (IST)
Tags: stambha lekh

 लोकनेते बाळासाहेब देसाई यांची बुधवार, दि.  10 मार्च 2010 रोजी (आज) 100 वी जयंती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे साजरी होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या लोकहितदक्ष कार्याचा मागोवा...
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रचंड कार्य केले. छ. शिवाजी महाराज, कोल्हापूरचे छ. शाहू महाराज, महात्मा फुले ही त्यांचे दैवते. सामान्य माणसाबद्दलचा जिव्हाळा त्यांच्या जीवनाची प्रेरक शक्ती. आचार्य प्र. के. अत्रे यांनी बाळासाहेबांना लोकनेते ही पदवी प्रथमत: महाराष्ट्रात सन्मानाने बहाल केली.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा जन्म
10 मार्च, 1910 रोजी त्यांचे आजोळ विहे
या ठिकाणी झाला. त्यांचे गाव मरळी. ही दोन्ही गावे पाटण तालुक्यातीलच. बाळासाहेब उर्फ
बाळू यांची आई दरुबाई त्यांच्या बालपणीच
निधन पावल्या. त्यांचा सांभाळ मावशी
पुतळाबाई यांनी केला. समोर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा एकच मार्ग त्यांना दिसत होता, तो म्हणजे शिक्षणाचा. शिकून मोठे झाले पाहिजे ही इच्छाशक्तीची शिदोरी घेवून शिक्षणासाठी त्यांनी वयाच्या अवघ्या आठव्या
वर्षी घराचा त्याग केला. परिस्थितीवर  मात
करताना त्यांनी चिरमुरे खावून दिवस काढले. 1925 मध्ये सातवीनंतरचे शिक्षण कोल्हापूरला घेताना संकटांना न जुमानता अक्षरश: जेवणाचे
वार लावले. काहीवेळा उपाशीपोटी राहून
त्यांनी चिकाटीने दारिद्र्याच्या सागरात गटांगळ्या खात पुढचे शिक्षण घेतले. शिक्षणवेड्या बाळासाहेबांनी एक वर्षात इंग्रजी अभ्यासक्रमाच्या तीन इयत्ता पूर्ण केल्या. अन्नाअभावी वर्गात घेरी येवून पडणाऱ्या बाळासाहेबांनी बारा वर्षाच्या खडतर तपानंतर बी.ए., एलएल. बी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले.
जनतेची वकिली
1937 मध्ये बी. ए., एलएल. बी. झाल्यानंतर पाटण आणि कराड येथे त्यांनी वकिली सुरू केली. कायद्याचे उत्तम ज्ञान, गोड वाणी, धिमा स्वभाव, निश्चयी बाणा व आपल्या पक्षकारांवर होणारा अन्याय न्यायालयात धारदारपणे पटवून केस जिंकण्याच्या हातोटीच्या गुणांमुळे वकिलीत त्यांचा जम बसला, परंतु आजपर्यंत सोसलेली गरिबी, अनुभवलेली विद्यार्थी दशेतील दारिद्र्याची सीमारेषा, काळ्या आईवर प्रेम करणारे कष्टाळू शेतकरी यांना जीवनाचा मार्ग दाखविणे हे ध्येय ओळखून समाजसुधारकांचा पिंड असलेल्या बाळासाहेबांचे वकिलीत मन रमले नाही. समाज परिवर्तनातून राजकारण करण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. त्यांनी 1940 मध्ये सातारा जिल्ह्याच्या जिल्हा लोकल बोर्डाच्या राजकारणात ब्रिटिश सरकारमधील धनजी शहा कूपर यांचे प्रस्थ मोडून काढण्याचा निर्धार केला. त्यांच्या विरोधात ते पाटण तालुक्यातून लोकल बोर्डाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले आणि प्रचंड बहुमताने अध्यक्षपदी निवडून आले. जिल्हा लोकल बोर्डामध्ये खऱ्या अर्थाने स्थानिक समाजसेवेच्या क्षेत्रात जनतेचा कारभार बाळासाहेबांच्या राजकारणातील सहभागामुळे सुरू झाला. लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदाची धुरा सलग बारा वर्षे सांभाळली. त्यांनी सातारा जिल्ह्याचा चेहरामोहराच बदलून टाकला. 1952 मध्ये पाटण तालुक्यातून विधानसभेसाठी ते बिनविरोध निवडून गेलेे. आमदार झाल्यापासून  त्यांनी जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू केले. मी ज्या जनतेचा प्रतिनिधी आहे, त्यांच्या अडीअडचणी दूर केल्या नाहीत तर त्यांच्यावतीने विधिमंडळात बसण्याचा मला अधिकार नाही असे त्यांचे ब्रीदवाक्य होते. ज्या महाराष्ट्रात आपण जन्मलो, वाढलो त्या मातृभूमीच्या सेवेसाठी आयुष्य वेचण्याचा त्यांचा आधीचाच निर्णय यामुळे पक्का झाला. 1957 मध्ये पुन्हा विधानसभेवरील निवडीनंतर ते बांधकाम मंत्री झाले.  राज्यातील रस्ते बांधणीचा प्रश्न आधी हाती घेतला. याचबरोबर राज्यातील पवित्र तीर्थक्षेत्रांप्रमाणे गड आणि किल्ले जोडणारे रस्ते घाट फोडून केले. याच काळात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी, पाटण तालुक्यातील कोयना धरणाची निर्मिती करून कोयनेची वीज संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोगात आली पाहिजे हा आग्रह त्यांनी पूर्ण करून दाखविला.
फी माफीचा निर्णय
शिक्षणमंत्री झाल्यानंतर त्यांनी 1200 रुपयांच्या आतील उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना शंभर टक्के फी माफीची (ईबीसी) सवलत जाहीर केली. महाराष्ट्रात साक्षरतेचे, सुशिक्षितांचे जे प्रमाण आपणास दिसून येते, त्यांच्या या धाडसी निर्णयानंतर देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी तुम्ही घेतलेला फी माफीचा निर्णय क्रांतिकारी आहे, असे उद्‌गार काढले. आजपर्यंत कोणत्याही राज्याच्या शिक्षणमंत्र्याने एवढा धाडसी निर्णय घेतला नाही. एन. सी. सी. च्या रुपाने लष्करी शिक्षण हे महाविद्यालयीन स्तरावर सक्तीचे करण्याचा आणखी एक निर्णय त्यांनी घेतला. याच काळात कोल्हापूरमध्ये छ. शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. भारताचे प्रवेशद्वार असणाऱ्या मुंबई येथील गेट वे ऑफ इंडियासमोर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा त्यांनी उभारला.
1962 मध्ये ते कृषिमंत्री झाले. शेतकरी सुखी झाल्याशिवाय समाजवाद येणे कठीण आहे, ही दूरदृष्टी ठेवून कृषी उत्पादनांच्या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये नवा विचार प्रवाह आणून जो कसेल त्याची जमीन या कायद्याला अनुसरुन शेती सुधारण्याच्या अनेक योजना आखत एकेक पाऊल पुढे टाकले. ते काही काळ गृहमंत्री होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या अनेक मुलांना रोजगार मिळवून दिला. महसूल मंत्री असताना त्यांनी नवा जमीन महसूल कायदा अंमलात आणला.
11 डिसेंबर, 1967 रोजी संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारा प्रलयंकारी भूकंप पाटण तालुक्यात झाला. भूकंपाची बातमी समजताच झटपट निर्णय घेवून त्यांनी मुंबईहून पाटण गाठले. भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन लक्ष घालून करुन घेतले. जनतेचा कैवारी, जनतेच्या हितासाठी वेळप्रसंगी कायद्यात बदल करुन झटणारा नेता म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राला दर्शन घडले. लोकनेते बाळासाहेब देसाई हे केवळ मंत्री नव्हते तर साहित्यिकांपासून शेतमजुरांमध्ये मिसळणारे मोठ्या मनाचे पुढारी होते.
गरीबांचा मंत्री
1978-79 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे ते अध्यक्ष होते. या जबाबदाऱ्या पार पाडताना
त्यांच्या नावाखालील ओळीतील विविध खात्याच्या पाट्या बदलल्या असल्या तरी बाळासाहेब देसाई
हे नाव कायम आहे. गोरगरीबांचा मंत्री म्हणून
त्यांनी महाराष्ट्राची मोठी सेवा केली आहे. महाराष्ट्राचा राष्ट्रीय खेळ असणाऱ्या कुस्तीला तसेच महाराष्ट्राची लोकधारा लावणीला त्यांनी राजाश्रय मिळवून दिला. मंत्री असताना स्टेजवर
भाषणबाजी करून टाळ्या मिळविण्याचा हव्यास त्यांना कधीच नव्हता तर आचरणातून ते लोकांपुढे धडे घालून देत असत. जबाबदारीची जाणीव असलेले आणि जबाबदारी पार पाडणारे असंख्य कार्यकर्ते, नेेते त्यांनी महाराष्ट्रात घडविले. लोकांच्यासाठी सत्ता भोगणारे आणि लोकांच्यासाठीच ती सोडणारे एकमेव मंत्री महाराष्ट्रात होवून गेले, ते म्हणजे लोकनेते बाळासाहेब देसाई! पाटण तालुक्यात असा महामानव निर्माण होणे हे तालुक्याचे भाग्यच! कोल्हापूरचे शेतकी महाविद्यालय व त्यांच्या जन्मभूमीत त्यांच्या नावाने सुरू असलेला मरळीचा साखर कारखाना, बॅंक, हॉस्पिटल, उपसा जलसिंचन योजना, दूध संस्था, औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे, विकास सेवा सोसायट्या व पाटणचे महाविद्यालयाबरोबरच त्यांच्या लोकहितवादी कार्याचे स्मरण महाराष्ट्राला सदैव राहील. 23 एप्रिल, 1983 रोजी त्यांचे निधन झाले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सामान्य जनतेच्या हृदयात जे मानाचे स्थान पटकावले होते, ते कोणीही हिरावून घेवू शकले नाही आणि काळसुध्दा ते हिरावून घेवू शकत नाही.
(लोकनायक या पुस्तकातून)
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: